चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला - ए श्रीकर प्रसाद
top of page

चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला - ए श्रीकर प्रसाद

२१ व्या पिफ अंतर्गत प्रसाद यांनी ‘दी इंव्हिजिबल आर्ट ऑफ फिल्म एडिटिंग’ विषयावर केले मार्गदर्शन


पुणे, दि. ३ फेब्रुवारी, २०२३ : चित्रपटाचा दिग्दर्शक हा संपूर्ण चित्रपटाच्या माध्यमातून आपली छाप सोडत असतो. कॅमेरामन हा व्हिज्युअलच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात कथा मांडत असतो. तर अभिनयाच्या माध्यमातून कलाकार ती गोष्ट गुंफत असतात मात्र चित्रपटाचा एडिटर करत असलेले काम हे इंव्हिजिबल आर्ट अर्थात अदृश्य कला आहे. मात्र त्याची परिणामकारकता ही चित्रपटाच्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक असल्याचे प्रतिपादन नऊ वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध चित्रपट एडिटर ए श्रीकर प्रसाद यांनी केले.


पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत ‘दी इंव्हिजिबल आर्ट ऑफ फिल्म एडिटिंग’ या विषयावर आज श्रीकर प्रसाद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते यांनी प्रसाद यांच्याशी संवाद साधला. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला. पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्वाचे संचालक डॉ. जब्बार पटेल हे देखील यावेळी उपस्थित होते.



यावेळी बोलताना प्रसाद म्हणाले, “एखादा शॉट दुसऱ्या शॉटला जोडणे हेच केवळ एडिटरचे काम आहे, असे सामान्य विचार अनेकांचे असतात. मात्र चित्रपटाची परिणामकारकता वाढवायची असेल तर चित्रपटाचे योग्य एडिटिंग आणि तो करणारा एडिटर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एडिटिंगमध्ये योग्य कट, योग्य वेळी असणे महत्त्वाचे ठरते.”


एडिटरने कथेशी एकरूप होत दिग्दर्शकाला अपेक्षित अर्थ प्रेक्षकांसमोर मांडण्यास मदत करणे गरजेचे आहे असे सांगत ते पुढे म्हणाले की, “भारतीय चित्रपट हा भाषा, भावना, डायलॉग आणि दृश्य यांचा समृद्ध मेळ असून हे सर्व एका धाग्यात जोडण्याचे प्रमुख काम हे एडिटर करीत असतो. दिग्दर्शकाची व्हिजन एडिटर पूर्णत्वास नेतो आणि म्हणूनच एडिटर व दिग्दर्शक यांच्या विचारांचा मेळ संपूर्ण चित्रपटाच्या प्रक्रियेत एक गेमचेंजर असतो.”


आज तांत्रिक गोष्टींच्या संदर्भात आपण बरेच प्रयोगशील झालो आहोत, मात्र केवळ व्हीएफएक्समध्ये न अडकता गरज असले तिथेच अशा बाबींचा वापर करणे योग्य आहे, असे मतही प्रसाद यांनी व्यक्त केले.


आजची तरुण पिढी ही ‘रेस्टलेस’ आहे त्यांना लगेच आपले नाव झालेले हवे असते मात्र एडिटिंग ही एक अविरत व रिअलिस्टिक प्रक्रिया आहे निरीक्षण प्रसाद यांनी मांडले.




चित्रपटाच्या जॉनर प्रमाणे एडिटिंगदेखील बदलते आणि ते तसेच हवे असे सांगत प्रसाद यांनी गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकाविलेल्या आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याचा अनुभव कथन केला. ते म्हणाले, “दोन तेलगु सुपरस्टार एकमेकांसमोर येत ‘कॅमेरा डेअर’ ने एकत्र डान्स करतायेत. त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे, त्याला भावनिक जोड आहे या विचाराने दिग्दर्शकाने पूर्ण पॅशनने, प्रयत्नपूर्वक आणि परिश्रम घेत हे गाणे शूट केले. या दोन्ही सुपरस्टार्सची ती डान्स करतानाची एनर्जी रिदमच्या मदतीने मांडण्याचा दिग्दर्शकाचा हा प्रयत्न यशस्वी झाला. केवळ भारतीय प्रेक्षक नाही तर जगभरातील प्रेक्षकांना याने भुरळ घातली. या गाण्याच्या यशाने आज भारतीय चित्रपटसृष्टीसाठी भविष्यात अनेक कवाडे खुली झाल्याचा आनंद आहे.”


चित्रपट तयार करणारा प्रत्येकजण हा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. या महोत्सवात प्रेक्षकांना अनेकविध चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे ही भाग्याची गोष्ट असून प्रेक्षकांनी एखादा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या विचारांप्रमाणे मत बनविणे चुकीचे आहे. तुम्ही खुल्या विचाराने चित्रपट पहा. तो तुम्हाला आवडेल नाही आवडणार पण तो बनविणाऱ्याचा सन्मान तुम्ही निश्चित करा, असेही श्रीकर प्रसाद यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी एडिटिंग केल्याने एखाद्या सीनची परिणामकारकता कशी वाढते याचे सोदाहर स्पष्टीकरण देखील श्रीकर प्रसाद यांनी उपस्थितांना दिले.



-- For any media related queries, please contact - Hundred Percent Public Relations Sneha - 9552583473 / Gayatri - 8329668649 / Nikhil - 8975320800 Hundred Percent Public Relations PIFF Media Team

bottom of page