top of page

महिला केंद्री चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित करण्याची मानसिकता बदलावी - विद्या बालन

पुणे, ८ फेब्रुवारी २०२३ : "पूर्वीच्या तुलनेत आता महिला केंद्री चित्रपट अधिक प्रमाणात निर्माण होत आहेत. ही एक चांगली बाब आहे. मात्र महिला केंद्री चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित करण्यावर अधिक भर दिला जात आहे. मोठ्या पडद्यावर असे चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत अजूनही अनेकांच्या मनात संकोच असतो. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे," असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांनी व्यक्त केले.


पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत अभिनेत्री विद्या बालन यांनी ‘चॅलेंजेस ऑफ फिमेल अॅक्टर्स इन दी एन्टरटेन्मेट वर्ल्ड’ या विषयावर मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. पटेल यांनी विद्या बालन यांची मुलाखत घेतली. चित्रपट क्षेत्रातील प्रवास, विविध भूमिकांमागील किस्से, महिला केंद्री चित्रपट आणि त्यांच्यासमोरील आव्हाने अशा अनेक विषयांवर विद्या बालन यांनी उपस्थितांशी दिलखुलासपणे संवाद साधला.विद्या बालन म्हणाल्या, "महिला केंद्री चित्रपट मोठ्या पडद्यावर चालतील की नाही, याबाबत अजूनही निर्माते साशंक असतात. अशावेळी तो चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणे हा त्यांना अधिक सुरक्षित पर्याय वाटतो. त्यामुळेच महिला केंद्री चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित करण्यावर अधिक प्राधान्य दिले जात आहे. जे माझ्यासाठी आजच्या काळात एक आव्हान आहे."


महिला केंद्री चित्रपटाच्या निर्मितीबाबत बोलताना विद्या बालन म्हणाल्या, " महिला कलाकारांसाठी आता चित्रपटात खूप चांगल्या भूमिका लिहिल्या जात आहेत. चित्रपटात हिरोची भूमिका ही आता खूप साचेबद्ध झाली आहे. ते एकतर नायक असतात अथवा एखाद्या घटनेचे बळी असतात. त्याउलट महिला कलाकारांच्या भूमिकेत बरेच वैविध्य असते. लोकांनाही अशा प्रकारचा कंटेंट पाहायला आवडतो. त्यामुळे महिला केंद्रित चित्रपट लिहण्याचे प्रमाण आता वाढले आहे."आपल्या अभिनय क्षेत्रातील संघर्षाबाबत बोलताना विद्या बालन म्हणाल्या, " मी ८ वर्षांची होते, त्यावेळी माधुरी दीक्षित यांना 'एक, दो, तीन...' या गाण्यात पहिले आणि तिथून मला त्यांच्यासारखे बनण्याची खूप इच्छा झाली होती आणि मी अभिनय करण्याचे ठरवले. चित्रपटासाठी ऑडिशन देताना ' चक्रम ' या मल्याळम सिनेमासाठी माझी निवड झाली. त्यामध्ये मोहनलाल यांच्यासोबत मी काम करणार होते. पण काही कारणाने तो सिनेमा रद्द झाला. त्यानंतर तब्बल १२ मल्याळम सिनेमातून मला काढून टाकण्यात आले. हे सर्व घडले ते ३ वर्षांच्या काळात, त्यावेळी मला 'पनौती' देखील म्हटले जायचे, अनेक निर्माते मला चित्रपटात घेण्यासाठी संकोच करायचे. तो अतिशय संघर्षाचा काळ होता. पुढे युफोरिया म्युझिक व्हिडिओ'ने चित्र बदलले, त्यानंतर परिणीता, इश्किया, कहानी, डर्टी पिक्चर असे अनेक चांगले चित्रपट मला मिळाले."एखाद्या राजकीय परिस्थितीबाबत मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती का बोलत नाही, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. पण कलाकारांनी राजकीय वक्तव्ये का करावी? चित्रपट, कलाकार हे तुमचे मनोरंजन करण्यासाठी आहेत, राजकीय वक्तव्ये करण्याचे काम राजकारण्यांनी करावे असे ठाम मत विद्या बालन यांनी यावेळी व्यक्त केले.


बॉक्स : शहरात २ जानेवारीपासून सुरु असलेल्या २१ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप गुरुवार दि. ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ समोरील सकल ललित कलाघर या ठिकाणी होणार आहे. महोत्सवाच्या समारोप प्रसंगी दाखविण्यात येणारी दिग्दर्शक मिशेल हजनविशिअस यांची ‘फायनल कट’ ही फिल्म बंडगार्डन येथील आयनॉक्स चित्रपटगृहात दुपारी ४ वाजता स्क्रीन नंबर ३ व ४ येथे दाखविण्यात येणार आहे. याची कृपया दखल घ्यावी.

bottom of page